Monday, November 28, 2016

श्री नवनाथ भक्तिसार अध्याय २४

श्रीगणेशाय नमः 
जयजयाजी निरंजना ॥ अलक्ष गोचरव्यक्त निर्गुणा ॥ 
पूर्णब्रह्मा मायाहरणा ॥ चक्रचाळका आदिपुरुषा ॥१॥ 
हे गुणातीता सर्वत्रभरिता ॥ सगुणरुपा लक्ष्मीकांता ॥ 
मागिले अध्यायीं रसाळ कथा ॥ मच्छिंद्रोत्सव दाविला ॥२॥ 
एका सुवर्णविटेसाठीं ॥ कनकगिरी करी गोरक्षजेठी ॥
आतां मम वाग्वटी ॥ भर्तरी आख्यान वदवीं कां ॥३॥ 
तरी श्रोते ऐका कथन ॥ पूर्वी मित्ररश्मी करितां गमन ॥ 
वातचक्रीं प्रेरुनि स्यंदन ॥ अस्ताचळा जातसे ॥४॥ 

तों उर्वशी विमानासनीं ॥ येत होती भूलोकअवनी ॥ 
तंव ती दारा मुख्यमंडनीं ॥ मदनबाळी देखिली ॥५॥ 
देखतांचि पंचबाणी ॥ शरीर वेधलें मित्रावरुणी ॥
वेघतांचि इंद्रियस्थानीं ॥ येऊनि रेत झगटलें ॥६॥ 
झगटतांचि इंद्रिय रेत ॥ स्थान सोडूनि झालें विभक्त ॥
विभक्त होता पतन त्वरित ॥ आकाशाहूनि पैं झालें ॥७॥ 
परी आकाशाहूनि होतांचि पतन ॥ वातानें तें विभक्तपण ॥
द्विभाग झालें महीकारण ॥ येऊनियां आदळलें ॥८॥ 
एक भाग लोमश आश्रमा ॥ येऊनि पावला थेट उत्तमा ॥ 
घटीं पडतांचि तनू उत्तमा ॥ आगस्तीची ओतली ॥९॥ 
यापरी दुसरा भाग ॥ तो कौलिक ऋषीच्या आश्रमा चांग ॥
येतांचि कैसा झाला वेग ॥ तोचि श्रवण करा आतां ॥१०॥ 
कौलिक घेऊनि पात्र भर्तरी ॥ मिक्षोद्देश धरुनि अंतरीं ॥
निघता झाला सदनाबाहेरी ॥ वस्तीपर्यटण करावया ॥११॥ 
परी कौलिक येतांचि बाहेर ॥ भर्तरी ठेवूनि महीवर ॥
बंद करीतसे सदनद्वार ॥ कवीटाळें देऊनियां ॥१२॥ 
परी भर्तरी ठेविली अंगणांत ॥ तों आकाशांतूनि रेत त्यांत ॥ 
येऊनियां अकस्मात ॥ भाग एक आदळला ॥१३॥ 

तों इकडे कौलिक ऋषी ॥ टाळे देऊनि गृहद्वारासी ॥
येऊनि पाहे भर्तरीसी ॥ तों रेत व्यक्त देखिलें ॥१४॥ 
रेतव्यक्त देखतांचि पात्र ॥ अंतःकरणीं विचारी तो पवित्र ॥ 
चित्तीं म्हणे वरुणीमित्र ॥ रेत सांडिलें भर्तरीं ॥१५॥ 
तरी यांत धृमीनारायण ॥ अवतार घेईल कलींत पूर्ण ॥
तीन शत एक सहस्त्र दिन ॥ वर्षे लोटलीं कलीचीं ॥१६॥ 
इतकीं वर्षे कलीची गेलिया ॥ धृमींनारायण अवतरेल भर्तरीं या ॥ 
तरी आतां भर्तरी रक्षूनियां ॥ ठेवूं आश्रमीं तैसीच ॥१७॥
मग ती भर्तरी रेतव्यक्ती ॥ रक्षिता झाला आश्रमाप्रती ॥ 
त्यास दिवस लोटतां बहुतां ॥ पुढें कलि लागला ॥१८॥ 
मग तो कौलिक ऋषी ॥ गुप्त विचारितां प्रगट देशीं ॥ 
भर्तरी नेऊनि मंदराचळासी ॥ गृहाद्वारीं ठेविली ॥१९॥
गृहाद्वारीं ठेवूनि पात्र ॥ तो अदृश्य विचरे पवित्र ॥
तों कलि लोटतां वर्षे तीन सहस्त्र ॥ एकशतें तीन वर्षे ॥२०॥ 
तों द्वारकाधीशअंशें करुन ॥ भर्तरींत संचरला धृमीनारायण ॥ 
जीवित्व व्यक्त रेताकारण ॥ होतांचि वाढी लागला ॥२१॥ 
वाढी लागतां दिवसेंदिवस ॥ पुतळा रेखित चालिला विशेष ॥ 
पूर्ण भरतां नवमास ॥ सिद्ध झाला तो पुतळा ॥२२॥ 

परी मधुमक्षिकेनें पात्रांत ॥ मधूचें जाळें केले होतें ॥ 
तयाचे संग्रहें व्यक्त ॥ बाळ वाढी लागला ॥२३॥ 
वाढी लागतां मधुबाळ ॥ नवमास लोटतां गेला काळ ॥
परी तो देहें होता स्थूळ ॥ भर्तरी पात्र मंगलें ॥२४॥ 
बहुत दिवसांचे पात्रसाधन ॥ झालें होतें कुइजटपण ॥ 
त्यांत पर्जन्यकाळीं कड्यावरुन ॥ पर्वत कोसळता लोटले ॥२५॥ 
कोसळतां परी एक पाषाण ॥ गडबडीत पातला तें स्थान ॥ 
परी पावतांचि पात्रासी झगडोन ॥ भर्तरी भंग पावली ॥२६॥ 
भर्तरी भंगतांचि बाळ त्यांत ॥ तेजस्वी मिरवले शकलांत ॥
मक्षिकेचे मोहळ व्यक्त ॥ तेहीं एकांग जाहलें ॥२७॥ 
मग त्यांत निर्मळपणीं बाळ विरक्त ॥ मिरवों लागलें स्वतेजांत ॥
जैसें अभ्र वेगळें होतां दीप्त ॥ निर्मळपणीं मिरवतसे ॥२८॥ 
कीं स्थिरावल्या जैसे जीवन ॥ तळा बैसलें गढूळपण ॥ 
तें बाळ भर्तरी शुक्तिकारत्न ॥ विमुक्त झालें वेष्टणा ॥२९॥ 
परी कडा कोसळला कडकडीत ॥ शब्द जाहले अति नेट ॥ 
तेणेंकरुनि मक्षिका अचाट ॥ भय पावोनि पळाल्या ॥३०॥ 
येरीकडे एकटें बाळ ॥ शब्दरुदनीं करी कोल्हाळ ॥ 
तेथें चरे कुरंगमेळ ॥ तया ठायीं पातल ॥३१॥ 

तयांत गरोदर कुरंगिणी ॥ चरत आली तये स्थानीं ॥
तों बाळ रुदन करितां नयनीं ॥ निवांत तृणीं पडलेंसे ॥३२॥ 
तरी अफाट तृण दिसे महीं ॥ त्यांतही बाळ सबळ प्रवाहीं ॥ 
चरत येतां हरिणी तया ठायीं ॥ प्रसूत झाली बाळ पैं ॥३३॥ 
प्रसूत होतां बाळें दोन्ही ॥ झालीं असतां कुरंगिणी ॥
पुनः मागें पाहे परतोनी ॥ तों तीन बाळें देखिलीं ॥३४॥ 
माझींच बाळे त्रिवर्ग असती ॥ ऐसा भास ओढवला चित्तीं ॥ 
मग जिव्हा लावूनि तयांप्रती ॥ चाटूनि घेतलें असे ॥३५॥ 
परी तो खडतरपणी दोन्ही पाडसें तीतें ॥ संध्याअवसरीं झगडलीं स्तनातें ॥
परी हें बाळ नेणे पानातें ॥ स्तन कवळावें कैसे तें ॥३६॥ 
मग ते कुरंगिणी लोटूनि पाडस ॥ चहूंकडे ठेवूनि चौपदांस ॥ 
मग वत्सलोनि लावी कांसेस ॥ मुख त्याचें थानासी ॥३७॥ 
ऐसे लोटतां कांहींएक दिवस ॥ तों तें रागूं लागलें महीस ॥ 
मग ते मृगी लावूनी थानास ॥ संगोपन करीतसे ॥३८॥ 
ऐसें करवोनि स्तनपानीं ॥ नित्य पाजी कुरंगिनी ॥ 
आपुले मुखींची जिव्हा लावूनी ॥ करी क्षाळण शरीरासी ॥३९॥ 
पाडसें ठेवूनि तया स्थानीं ॥ चरूं जातसे विपिना हरिणी ॥
घडोघडी येतसे परतोनी ॥ जाई पाजूनि बाळातें ॥४०॥ 

ऐसें करितां संगोपन ॥ वर्षे लोटलीं तयातें दोन ॥ 
मग हरिणामध्येंचि जाऊन ॥ पत्रें भक्षी वृक्षांची ॥४१॥ 
परी त्या वनचरांचे मेळीं ॥ विचारितां सावजभाषा सकळी ॥ 
स्पष्ट होऊनि त्या मंडळीं ॥ त्यांसमान बोलतसे ॥४२॥
हस्तिवर्ग गायी म्हैशी व्याघ्र ॥ जंबुक लांडगे हरिण भयंकर ॥ 
शार्दूळ रोही गेंडा सांबर ॥ भाषा समजे सकळांची ॥४३॥
सर्प किडे मुंगी पाळी ॥ पक्षी यांची बोली सकळी ॥ 
तैसेंचि कोकूनि उत्तर पावलीं ॥ देत असे सकळांसी ॥४४॥ 
ऐसियापरी वनचर - रंगणी ॥ प्रत्यक्ष अवतार विचरे काननीं ॥ 
जिकडे जिकडे जाय हरिणी ॥ तिकडे तिकडे जातसे ॥४५॥
ऐसें पांच वर्षेपर्यंत ॥ हरिणीमागें तो हिंडत ॥
तों एके दिवशीं चरत ॥ हरिणी आली त्या मार्गे ॥४६॥ 
काननीं चरतां मार्गे नेटें ॥ तो बाळही आला ते वाटे ॥ 
तों मार्गी सहस्त्रीपुरुष भाट ॥ मग त्या वाटे तीं येती ॥४७॥ 
त्या भाटा जयसिंग नाम ॥ कांता रेणुका सुमध्यम ॥ 
परी उभयतांचा एक नेम ॥ एकचित्तीं वर्तती ॥४८॥ 
प्रवर्तती परी कैसे अलोटीं ॥ शत्रुमित्र ऐक्यदृष्टीं ॥ 
कीं धनदघातका मोह पोटीं ॥ समानचि वर्ततसे ॥४९॥ 

तन्न्यायें पुरुषकांता ॥ प्रपंचराहाटीं वर्तत असतां ॥ 
तों सहज त्या मार्गे येतां ॥ तया ठायीं पातले ॥५०॥
पातले परी मार्गावरती ॥ बाळ देखिले दिव्यशक्ती ॥ 
बालार्ककिरणी तेजाकृती ॥ लखलखित देखिलें ॥५१॥ 
कीं सहजासहज करावया गमन ॥ महीं उतरला रोहिणीरमण ॥
कीं पावकतेजकांती वसन ॥ गुंडाळलें वाटतसे ॥५२॥
ऐशापरी तेजःपुंज ॥ जयसिंग भाट देखतां सहज ॥
मनांत म्हणे अर्कतेज ॥ बाळ असे कोणाचें ॥५३॥
ऐसें स्त्रियेसी म्हणतसे ॥ ऐसिया अरण्यांत असे ॥ 
बाळ सांडूनि गेली सुरस ॥ मातापिता कैसी तीं ॥५४॥ 
कीं सहजचाली चालतां ॥ यांत चुकली याची माता ॥
ऐसे अपार संशय घेतां ॥ तयापाशीं पातले ॥५५॥ 
पातले परी बाळ पाहोन ॥ भयें व्याप्त झालें मन ॥
मग मृग बोलिले आरंबळोन ॥ पळूं लागले मार्गातें ॥५६॥ 
तें पाहूनि जयसिंग भाटें ॥ धांवोनि धरिली बाळकाची पाठ ॥
पाठीं लागूनि धरुनि मनगट ॥ उभा केला बाळ तो ॥५७॥ 
उभा करुनि त्यातें बोलत ॥ म्हणे बाळा सांडीं भयातें ॥
तूतें भेटवीन तव मातेतें ॥ माता कोण ती सांग ॥५८॥ 

परी तैं कुरंगभाषेकरुन ॥ आरंबळतसे छंदेंकरुन ॥ 
नेत्रा लोटलें अपार जीवन ॥ हांक मारी हरिणीतें ॥५९॥ 
परी ते हरिणी बाळ पाहून ॥ कासावीस झाले परम प्राण ॥ 
परी मनुष्यभयेंकरुन ॥ निकट येऊं शकेना ॥६०॥ 
हरिणी आपुले ठायींच्या ठायीं ॥ परम आरंबळें महीते देहीं ॥
येरीकडे मार्गप्रवाहीं ॥ भाट बोले बाळातें ॥६१॥ 
म्हणे वत्सा व्यर्थ कां रडसी ॥ कोण मातापिता आहे तुजसी ॥ 
सोडूनि गेलीं अरण्यासी ॥ तरी भेटवूं तुज आतां ॥६२॥ 
परी कुरंगभाषेकरुन ॥ ब्यां ब्यां करुनि करी रुदन ॥
मग भाट म्हणे हें वाचाहीन ॥ मुखस्तंभ वाटतसे ॥६३॥ 
मग हस्तखुणेनें पुसे त्यांतें ॥ परी खूणही तें नेणे परतें ॥
मग जयसिंग म्हणे आपुले मनातें ॥ परम अज्ञानी बाळक हें ॥६४॥ 
तरी आतां असो कैसें ॥ यातें आपुल्या न्यावें वस्तीस ॥ 
याची जननी भेटल्यास ॥ हस्तगत यातें करुं ॥६५॥ 
ऐसा विचार करुनि मनासीं ॥ उचलूनि घेतला स्कस्कंधासीं ॥ 
परी तें आरंबळोनि हरिणीसी ॥ पाचारीत अट्टहास्यें ॥६६॥
परी ती कुरंगभाषा कांहीं ॥ जयसिंगातें माहीत नाहीं ॥ 
तैसें वाहूनि मार्गप्रवाहीं ॥ घेऊनि जात बाळका ॥६७॥ 

परी त्या बाळकासी घेऊनि जातां ॥ अति आरंबळे हरिणी चित्ता ॥ 
सव्यअपसव्य वेढा भंवता ॥ घेऊन हंबरडा मारीतसे ॥६८॥ 
बाळावरी ठेवूनी दृष्टी ॥ धांव घेतसे पाठोपाठीं ॥ 
ठायीं ठायीं महीतटीं ॥ उभी राहूनि आरंबळे ॥६९॥ 
ऐसी हरिणी आरंबळत ॥ दुरोनि त्यासी मार्ग गमत ॥
परी तो जयसिंग पाहूनि मनांत ॥ विचार करी आपुल्या ॥७०॥
म्हणे ही हरिणी कवणे अर्थी ॥ हिंडत आहे काननाप्रती ॥ 
पाडस चुकार झालें निगुतीं ॥ म्हणोनि हिंडे विपिनी ही ॥७१॥ 
ऐसियेपरी चित्तीं भास ॥ भासूनि गमन करीतसे मार्गास ॥ 
गमन करितां स्वगृहास ॥ वस्तीत जाऊनि पोहोंचला ॥७२॥
मग ती वस्ती पाहोनि हरिणी ॥ विपिना गेली निराशपणीं ॥ 
परी ठायीं ठायीं उभी राहूनि ॥ हंबरडा मारी आक्रोशें ॥७३॥ 
येरीकडे जयसिंग भाट ॥ येतां ग्रामा झाला प्रविष्ट ॥
बाळ ओपूनि कांते सुभट ॥ वस्ती फिरुं पातला ॥७४॥ 
सकळ वस्तीची फेरी फिरुन ॥ पुन्हां शिबिरा येत परतोन ॥ 
ऐसे करितां मास तीन ॥ लोटूनि गेले वस्तीसी ॥७५॥ 
परी तें बाळ आरंबळतां ॥ भयानें राहिली सकळ व्यथा ॥
मग थोडी थोडी संवय लागतां ॥ हरिणीस विसर पडला ॥७६॥ 

तेचि नीतीं बाळ विसर ॥ शनैक पडला कुरंगापर ॥ 
मग भोजनपानादिक सारासार ॥ कळों सविस्तर लागलें ॥७७॥ 
बोली चाली शनैःशनैक ॥ प्रविष्ट जाहलें तें बाळक ॥
मग हांका मारी जननी जनक ॥ भक्षावया मागतसे ॥७८॥ 
असो ऐसियापरी अलोट ॥ ग्रामोग्रामीं हिंडे भाट ॥
हिंडतां हिंडतां भागीरथी तट ॥ काशीक्षेंत्रीं पातला ॥७९॥ 
पातला परी विश्वेश्वरीं ॥ दर्शना जात देवालयांतरीं ॥
स्नान करुनि भागीरथीतरीं ॥ बाळ घेऊनि गेला असे ॥८०॥ 
विश्वेश्वराचें दर्शन करीत ॥ तों लिंगातूनि बोलिला उमाकांत ॥
यावें भर्तरीअवतारांत ॥ दृश्य झालां तुम्हीं कीं ॥८१॥ 
ऐसे ऐकूनि नमस्कारितां ॥ शब्दोदयीं झाला बोलता ॥ 
त्याचे ते शब्द सहजता ॥ जयसिंगें ऐकिले ॥८२॥ 
मग तो मनांत करी विचार ॥ बाळ हें करितां नमस्कार ॥ 
शिवलिंग बोले अति मधुर ॥ भर्तरी ऐसें म्हणोनि ॥८३॥ 
तरी हा आहे कोन अवतारदक्ष ॥ स्वर्गवासी आहे प्रत्यक्ष ॥
परी प्रारब्धयोगें आम्हां सुलक्ष ॥ प्राप्त झाला वाटतसे ॥८४॥ 
जैसा दारिद्रिया मांदुसघट ॥ सहज चालतां आदळे वाट ॥
तेवीं आम्हां बाळ चोखट ॥ प्राप्त झालें दैवयोगें ॥८५॥ 

कीं चिंतातुरासी चिंतामणी ॥ अवचट लाधला मार्गेकरुनी ॥ 
तेवीं मातें अवतारतरणी ॥ प्राप्त झाला दैवानें ॥८६॥ 
कीं दुष्ट काळाची थोर रहाटी ॥ प्राण अन्नाविण होतां कष्टी ॥
तैं सुरभि येऊनि कृपाहोटीं ॥ थान आपुलें ओपीतसे ॥८७॥ 
तन्न्याय मातें झालें ॥ निर्देवा दैवें बाळ लाधलें ॥ 
लाधलें परी पुण्य पावलें ॥ अवतारी दिसतो हा ॥८८॥ 
हें पुण्य तरी वर्णू केवढे ॥ जयासाठीं हा स्थूळवट दगड ॥ 
हर्षे पावूनि संस्कारपाड ॥ यावें भर्तरी म्हणतसे ॥८९॥ 
तरी आतां भर्तरी नाम ॥ थोर पाचारुं वाचेकारण ॥
ऐसीं चित्तीं कल्पना योजून ॥ पुन्हां शिबिरा पातले ॥९०॥ 
पातले परी कांतेलागून ॥ सर्व निवेदिलें वर्तमान ॥
म्हणे हा पुत्र तुजकारण ॥ अवतारदक्ष सांपडला ॥९१॥ 
तरी हा अवतारदक्ष कैसा ॥ म्हणशील तरी वो वाग्रसा ॥
तरी शिव प्रत्यक्ष बोलिला ऐसा ॥ यावें भर्तरी म्हणोनी ॥९२॥ 
अगे हा बाळ करितां नमन ॥ ध्वनि हे निघाली लिंगांतून ॥ 
ती म्यां ऐकिली आपुल्या कानें ॥ म्हणोनि म्हणतों अवतार हा ॥९३॥ 
तरी आतां येथूनि याते ॥ भर्तरी ऐसें नाम निश्वित ॥ 
पाचारुनि अंतर्भूत ॥ पालन करीं बाळाचें ॥९४॥ 

ऐसें सांगूनि तो युवती ॥ टाकूनि गेला फेरीप्रती ॥ 
परी श्रोते चित्तीं कल्पना घेती ॥ शिव कां बोलिला भर्तरी ॥९५॥
यावें भर्तरी ऐसें वचन ॥ किमर्थ बदला उमारमण ॥
तरी तो भर्तरीत पावला जन्म ॥ म्हणोनि शिव बोलिला असे ॥९६॥ 
भर्तरी अवतार सघन ॥ यावें भर्तरी ऐसें म्हणोन ॥ 
तरी आतां ऐसें ऐका वचन ॥ कथा पुढें परिसावी ॥९७॥ 
ऐसें जयसिंग रेणुकेसी ॥ सांगूनि वर्तमान तियेसी ॥ 
भर्तरी नाम आनंदेसीं ॥ पाचारीत उभयतां ॥९८॥ 
त्या उभयतांचें जठरांतरीं ॥ संतति नसे संसारविहारीं ॥ 
म्हणोनि स्नेहाची भोहित लहरी ॥ बोलली असे तयातें ॥९९॥ 
रेणुका नित्य बैसवोनि अंकीं ॥ चुंबन घेतले लालनअंकीं ॥
नाना पदार्थ मागितले कीं ॥ आणूनि देती उमयतां ॥१००॥ 
आसन वसन भोजन पान ॥ देती करिती बहु लालन ॥ 
बाळ खेळतांना पाहून ॥ हर्षयुक्त होती ते ॥१॥ 
बाळ भर्तरी पंचवर्षी ॥ बोबडे बोले नाचे महीसी ॥ 
नाच नाचोनि धांवोनि कंठासी ॥ मिठी घाली मातेच्या ॥२॥ 
मिठी घालितां रेणुका सती ॥ उचलूनि घेत अंगावरती ॥
चुंबन घेतां उभय तीं ॥ हास्यवदन करिताती ॥३॥ 

हांसूनि एकमेकां म्हणती ॥ ईश्वर पावला आपणांप्रती ॥ 
उदरीं नसतां स्वसंतती ॥ ईश्वरें दिधली कृपेनें ॥४॥ 
दिधली परी आक्षेप चित्तासी ॥ घेऊनि म्हणती या बाळासी ॥ 
मातापिता चुकल्यासी ॥ शोधित असतील महीतें ॥५॥ 
परी ते शोधितां कोठें ॥ अवचित जरी पडली गांठ ॥
मग ते आपणां पासूनि नेटें ॥ घेऊनि जातील बाळातें ॥६॥ 
ऐसी चिंता उभय तीं ॥ नित्य त्निय हदयीं वाहती ॥ 
अहा हें बाळ अलोलिक स्थिती ॥ स्वरुपा मिती नसे याच्या ॥७॥ 
ऐसें बाळ हें परम सगुण ॥ हें तों नेतील आम्हांपासून ॥ 
ऐसें चिंतिती परी मन ॥ घोंटाळत उभयतांचे ॥८॥ 
मग ते उभयतां विचार करिती ॥ कीं यास सोडूनि क्षेंप्रत्राती ॥ 
मही हिंडतां कोणे क्षिती ॥ गांठी पडेल तयांची ॥९॥ 
मग त्या क्षेत्रीं स्थळ पाहून ॥ राहते झाले भिक्षुकपणें ॥ 
भिक्षा मागूनि क्षेत्राकारण ॥ निर्वांहातें चालविती ॥११०॥ 
यापरी तें भर्तरी बाळ ॥ मेळ मुलांचे स्थावरमंडळ ॥ 
तयांमाजीं खेळे खेळ ॥ राजचिन्हें सर्वस्वीं ॥११॥ 
आपण सर्वांचा होऊनि राव ॥ मुलांचींच मुलें सर्व ॥ 
काठीचे करुनि अश्व ॥ शाळा लाविल्या तयानें ॥१२॥ 

मंत्री परिचारक पायदळ जन ॥ स्वार झुंझार कारकून ॥
नाना वेष मुलांस दाखवून ॥ राजचिन्हें करीतसे ॥१३॥ 
तरी खेळ नव्हे भविष्य होणार ॥ होय भाग्याचा संस्कार ॥
जैसें ज्याचें भाग्य पर ॥ चिन्हें उदय पावलीं ॥१४॥ 
तरी असो राजचिन्हीं ॥ खेळ खेळतां बाळपणी ॥ 
तों एके दिवशीं आरोहणोनी ॥ काष्ठशालिके पळताती ॥१५॥ 
पळती ते वाताकृती ॥ मुखें हो हो करुनि म्हणती ॥
हो हो म्हणूनि थापटिती ॥ काष्ठशालिके अश्वातें ॥१६॥ 
ऐसें खेळतां सोडूनि क्षेत्र ॥ धांवती भरले काननीं सर्वत्र ॥
एकांत विपिनी खेळ खेळत ॥ सान्निध कोणी नसेचि ॥१७॥ 
परी ते काननचव्हाट्यांत ॥ भर्तरी धांवतां शालिका अश्वातें ॥
तों पायासी ठेंच लागूनि महीतें ॥ उलथोनियां पडियेला ॥१८॥ 
पडिला महीं कासावीस ॥ होऊनि सांडिलें शुद्धबुद्धीस ॥ 
नेत्रें विकासूनि महीतें ॥ दाविता झाला तत्क्षणीं ॥१९॥ 
ते श्वेतवर्ण पाहूनि नयन ॥ अर्भकें पळालीं भयेकरुन ॥ 
म्हणती भर्तरी पावला मरण ॥ भूत होईल आता हा ॥१२०॥ 
मग हा आपुल्या लागोनि पाठीं ॥ भक्षील सकळ मग शेवटीं ॥ 
ऐसें भय मानूनि पोटीं ॥ पळूनि गेलीं अर्भकें ॥२१॥ 

जाऊनि भागीरथीघांटावर ॥ करीत बैसलीं आहेत विचार ॥ 
म्हणती भर्तरिया भूत थोर ॥ होऊनि हिंडे ग्रामांत ॥२२॥ 
मग गडे हो आपण गल्लींसी ॥ कैसें खेळावें भक्षील आपणांसी ॥ 
तरी आतां आपुले ग्रामासी ॥ खेळ खेळूं सदनांत ॥२३॥ 
यापरी दुसरा अर्भक बोलत ॥ कीं बरवें सांडिलें काननातें ॥
मनुष्य कोणी नव्हतें तेथें ॥ भक्षिलें असतें आपणांसी ॥२४॥ 
ऐसें अर्भक घांटावर ॥ करीत बैसले आहेत विचार ॥ 
तों येरीकडे मूर्च्छा अपार ॥ भर्तरांतें वेधली ॥२५॥ 
महीं पडलासे उलथोन ॥ शरीर सुकलें तेणेंकरुन ॥
ठायीं ठायीं भेदले पाषाण ॥ रुधिर तेणें वाहातसे ॥२६॥
ऐसे होतां अवस्थेसी ॥ मैत्रावरुणें पाहिलें त्यासी ॥ 
मग पुत्रमोह हदयासी ॥ परम कळबळा दाटला ॥२७॥ 
मग महीस मित्रावरुणी ॥ येता झाला स्नेहेंकरुनी ॥ 
अति लगबगें बाळ उचलोनी ॥ हदयालागीं कवळिलें ॥२८॥ 
त्वरें आणूनि भागीरथीजीवन ॥ तयासी करविलें तोयपान ॥ 
हदयालागीं आलिंगून ॥ सावध केलें बाळासी ॥२९॥ 
आणि पाहूनि स्वयें कृपादृष्टीं ॥ मग दुःखलेशाची झाली फिटी ॥
पाषाणघांव घसवटीं ॥ अदृश्यपणें मिरविले ॥१३०॥ 

मग तो बाळ सावधपणीं ॥ अंकीं घेऊनि मिरवोनी ॥ 
परम स्नेहें मुखावरोनी ॥ वरदहस्तें कुरवाळी ॥३१॥ 
यापरी विप्राचा वेष धरोनि ॥ तेथोनि चालिला मित्रावरुणी ॥ 
भर्तरीचा धरोनि पाणी ॥ सदनालागीं आणीतसे ॥३२॥ 
तों मार्गी येतां घाबरे ॥ पाहते झाले सर्व किशोर ॥
पाहतांचि म्हणती भर्तरी थोर ॥ भूत होऊन आला रे ॥३३॥ 
ऐसें म्हणूनि आरडोनी ॥ पळताती अति भयेंकरुनी ॥ 
आपुलाले सदना जाऊनी ॥ भयें दडती संधींत ॥३४॥ 
येरीकडे मित्रावरुणी ॥ सदनीं आला त्यासी घेऊनी ॥
माता रेणुकेसी पाचारोनी ॥ म्हणे सांभाळी बाळातें ॥३५॥
मग ते चरणीं ठेवूनि माथा ॥ म्हणे महाराजा हे ताता ॥
आपण कोण्या ग्रामी असतां ॥ परम स्नेहाळू आहां कीं ॥३६॥ 
ते रेणुका प्रेमळ सती ॥ पाहतां विप्र दिव्य मूर्ती ॥ 
वस्त्रासन टाकूनि निगुती ॥ बैसविलें त्यावरी ॥३७॥ 
मग म्हणे बाळका करीं कवळून ॥ आणिलें तुम्हीं मोहेंकरुन ॥
तरी सकळ संशय सोडून ॥ नामाभिधान मज सांगा ॥३८॥ 
येरी म्हणे वो सती ऐक ॥ या बाळाचा मी असें जनक ॥ 
म्हणोनि स्नेहाचें दोंदिक ॥ तरी तुजपाशीं मी आलों ॥३९॥ 

तरी बाळ तुजकारणें ॥ कायावाचा केलें अर्पण ॥ 
परी तूंही आतां संशय टाकून ॥ संगोपन करीं याचें ॥१४०॥ 
तें ऐकून बोलें ऐसें ॥ तुम्ही बाळकाचे जनक कैसे ॥ 
येरी म्हणे वो अनायासें ॥ कथा ऐक बाळाची ॥४१॥ 
अगे मी विप्रवेषें तूतें ॥ दिसत आहें परी मी दैवत ॥ 
मित्रावरुणी नाम मातें ॥ महीलागीं वदतात ॥४२॥ 
मग मूळापासूनि तीतें कथन ॥ भर्तरीपात्रव्यक्त जनन ॥ 
हरिणीस्तनीचें संगोपन ॥ सकळ निर्णय बदलासे ॥४३॥ 
तरी या बाळाचें संभवन ॥ अपूर्व आहे महीकारण ॥
परी असो पूर्ण दैवानें ॥ लाभ झाला तुज याचा ॥४४॥ 
झाला परी आर्तभूत ॥ जगीं म्हणावीं कां आपुला सुत ॥ 
काया वाचा बुद्धि सुत ॥ रक्षण करीं उचित हें ॥४५॥ 
ऐसें सांगूनि मित्रावरुणी ॥ जाता झाला आपुले स्थानीं ॥
येरीकडे नितंबिनी ॥ परम चित्तीं तोषली ॥४६॥ 
मग भ्रतारासी सांगूनि वर्तमान ॥ तोही हर्षे ऐकून ॥ 
मग जननीजनकांचें भय पूर्ण ॥ बाळप्रकरणीं फिटलें कीं ॥४७॥ 
जैसे वस्त्र स्पर्शिल्या साबणीं ॥ सकळ मळाची होय हानी ॥
ठेवी मित्रावरुण वाचेकरुनी ॥ सकळ संशय फिटलासे ॥४८॥ 

किंवा गढूळ झालें असतां उदक ॥ स्थिरावल्या दावी पवित्र मुख ॥
तेवीं त्याचा समूळ धाक ॥ फिटूनि गेला तत्काळ ॥४९॥ 
की दारा सगुणपर ॥ गृहीं असतां गरोदर ॥ 
परी प्रसूतीचे भय थोर ॥ प्रसूत झालिया फिटतसे ॥१५०॥ 
कीं अनभ्यस्त कांसे लागतां ॥ परम भय मानी पार होतां ॥ 
परी पार झालिया सकळ चिंता ॥ फिटोनि जाय सरितेची ॥५१॥
कीं अचाट काननीं तस्करभयातें ॥ मार्ग मिळाला भयव्यक्त ॥
परी वस्ती पावल्या स्वस्थचित्त ॥ भयापासूनि होतसे ॥५२॥ 
तन्नायें मित्रावरुणी ॥ वार्ता ऐकतां उभय कर्णी ॥
भयमुक्त होती आनंदोनी ॥ हेलावे चित्त पूर्णत्वें ॥५३॥ 
जैसें दुःख जाऊनि होतां सुख ॥ पोसे शरीर दोंदिक ॥
तेवीं त्यांचे चित्तीं बलाइक ॥ आनंदाचा उदेला ॥५४॥ 
मग ते अतिप्रेमेंकरुन ॥ आशापाशाचें गुंतले बंधन ॥ 
मग परम स्नेहाचा खुंट उभवोन ॥ गरके घालिति त्यासवे ॥५५॥ 
ऐसियापरी दिवसेंदिवस ॥ परम उदेले लालनपालनास ॥
तंव काशीक्षेत्रीं पुण्यवस्तीस ॥ पंच वरुषें लोटलीं ॥५६॥ 
तों षडदशवर्षी भर्तरीनाथ ॥ पूर्ण झाला वयें व्यक्त ॥ 
जयसिंग आणि रेणुकेप्रत ॥ लग्नविचार सूचला ॥५७॥ 

मग उभयतां बसूनि एकांतीं ॥ म्हणती चला जाऊं स्वदेशाप्रती ॥
लक्षूनि संबंधा जाती ॥ लग्न करुं बाळाचें ॥५८॥ 
ऐसा विचार उभयतां करोनि ॥ सोडितें झाले क्षेत्रालागोनी ॥ 
माळवादेशीं त्यांचा ग्राम उद्देशोनी ॥ मार्ग धरितां तयाचा ॥५९॥ 
मार्गी चालतां ग्रामोग्रामीं ॥ भिक्षा करिती भिक्षुकधर्मी ॥
मार्गी चालता भविष्य वर्मी ॥ विकट झगटलें येऊनि ॥१६०॥ 
मार्गी चालतां काननांत ॥ तस्कर येऊनि अकस्मात ॥
जयसिंग शस्त्रघातें ॥ मुक्त केला प्राणातें ॥६१॥ 
जवळी होतें वित्त कांही ॥ तें हिरोनि नेलें तस्करीं उपायीं ॥ 
जयसिंगाचें प्रेत महीं ॥ निचेष्टित पडियेलें ॥६२॥ 
मग तें पाहूनि रेणुका सती ॥ प्रेत कवळूनि देहानिगुती ॥
परम शोकें देहाप्रती ॥ सांडिती झाली तेधवां ॥६३॥ 
मग तीं उभयतां स्त्रीपुरुष ॥ भर्तरीनें काष्ठें मेळवूनि विशेष ॥
अग्नि लावूनि उभयतांस ॥ शोकडोहीं बुडाला ॥६४॥ 
उभयतांचें करितां दहन ॥ परी शोकविशोकें पोळे प्राण ॥
म्हणे अहा तात मातेनें ॥ कैसें सोडिलें काननीं या ॥६५॥ 
अहा तुम्ही जननी जनक ॥ पाहते झालां परत्रलोक ॥ 
यापरी महीतें मायिक ॥ कोणी नसे मजलागीं ॥६६॥ 

अहा जननी रेणुकानाम्नी ॥ कैसी गेली मज सोडोनी ॥
आतां आई आई म्हणोनि वाणी ॥ बोलावूं मी कोणातें ॥६७॥ 
अहा जननी तूं परम मायिक ॥ जाणत होतीस तृषाभूक ॥ 
आतां निकटपणी लोक ॥ परम कैसे पाहतील ॥६८॥ 
अहा जननी रात्रींतून ॥ तीन वेळां उठोन ॥ 
करवीत होतीस तोयपान ॥ तरी मन निष्ठुर कां केलें ॥६९॥ 
अहा हदयीं धरुनि करिसी चुंबन ॥ वाचे म्हणसी बाळ हें तान्हें ॥ 
ऐसें म्हणोनि उदकपान ॥ करवीत अससी नित्यशा ॥१७०॥ 
ऐसी माय तूं सघन ॥ असोनि केलें निष्ठुरपण ॥ 
मज ऐशा वनीं सोडून ॥ गेलीस कैसी जननीये ॥७१॥ 
अहा ताता जयसिंगनामी ॥ कैसा गेलासी मज टाकुना ॥ 
आता पृथ्वीवर दैन्यवाणी ॥ कोठे राहूं निराश्वित ॥७२॥ 
अहा ताता बाहेर जातां ॥ खाऊ मजला आणीत होतां ॥
तो मुगुटी खोवूनि सदनीं येतां ॥ पाचारुनि मज देशीं ॥७३॥ 
ऐसा मोह असतां पोटीं ॥ सांडूनि गेलास विपिनीं देठीं ॥ 
ऐसें म्हणूनि करसंपुटीं ॥ वक्षःस्थळ पिटीतसे ॥७४॥ 
ऐसें रुदन करीत करीत ॥ पेटवूनि झाला शांताचित्त ॥ 
परी तो तेथूनि न उठे त्वरित ॥ प्राण सोडूं पाहातसे ॥७५॥ 

तों मार्गेकरुन व्यवसाइक ॥ त्या वंजारें वृषभकटक ॥ 
त्यांनीं पाहूनि त्याचा शोक ॥ परम चित्तीं कळबळले ॥७६॥ 
मग तयापाशीं येऊन ॥ पुसोनि घेतले वर्तमान ॥ 
वर्तमान कळल्या बोलती वचन ॥ बोधनीती तयातें ॥७७॥ 
म्हणती अगा भटसुता ॥ शोक कारसी अति वृथा ॥ 
होणार झालें विषममाथा ॥ विधिअक्षरें नेमीत ॥७८॥ 
जरी तू आतां करिसी शोक ॥ तरी काय मिळतील जननी जनक ॥ 
ईश्वरकरणी प्रारब्ध फुटकें ॥ आपुलेंचि म्हणावे ॥७९॥
तरी आतां धैर्य करुन ॥ हित पहावें आपुलें आपण ॥ 
संसार करुनि आपुले मतीने ॥ तिन्ही लोकीं मिरवावें ॥१८०॥
ऐसें म्हणूनि बोध अपार ॥ उठविला त्याचा धरुनि कर ॥ 
मग संगें घेऊनि मुक्कामावर ॥ आणिलासे भर्तरी ॥८१॥
मुक्कामीं राहूनि सकळ जन ॥ रात्रीं देऊनि अन्नपान ॥ 
दुसरें दिवशीं सवें घेऊन ॥ पुन्हां जात व्यवसई ॥८२॥ 
ऐसेपरी सात पांच दिन ॥ शोक करितां गेले लोटून ॥
मग दिवसेंदिवस होऊनि विस्मरण ॥ सहजस्थिती वर्ततसे ॥८३॥ 

मग त्या व्यवसायिकां सहज ॥ करुं लागला तयांचें काज ॥ 
काज होता तेजःपुंज ॥ सकळ चाहती आदरानें ॥८४॥ 
मग आसन वसन भूषणासहित ॥ व्यवसाइक सकळ संपादित ॥ 
ऐसेपरी कांहीं दिवस त्या स्थितींत ॥ लोटून गेले तयाचे ॥८५॥ 
यापरी व्यवसाइक ॥ धान्य भरुनि अति अमूप ॥ 
उज्जनि शहर अवंतिक ॥ मार्ग धरिला तयाचा ॥८६॥ 
मार्ग सरतां वृक्षमकटका ॥ येऊनि पोहोंचला अवंतिका ॥ 
तेथें कथेचा रस निका ॥ होईल तो स्वीकारा पुढें ॥८७॥ 
म्हणाल पुढिलें अध्यायीं रस ॥ उगाचि मानाल स्वचित्तास ॥ 
ऐसें तरी न म्हणावें पीयूष ॥ चवी घेतां कळों येईल ॥८८॥ 
तरी ती कथा सुधारस थोर ॥ वाढी श्रोत्या धुंडीकुमर ॥
मालू ऐसा नामोच्चार ॥ नरहरिकृपें मिरवतसे ॥८९॥ 
स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥
सदा परिसोत भाविक चतुर ॥ चतुर्विशति अध्याय गोड हा ॥१९०॥ 
श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥ 
॥ नवनाथभक्तिसार चतुर्विशतितमोध्याय समाप्त ॥

No comments:

Post a Comment